मोठी बातमी! विधान परिषदेच्या सभापतींचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ 

पाटणा : बिहार विधान परिषदेचे सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अवधेश नारायण सिंह यांनी सोमवारी सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा उपसभापतींकडे सुपूर्द केला असून तो स्वीकारण्यात आला आहे.

सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहार विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी जनता दल युनायटेड (JDU) कडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या विधान परिषदेचे उपसभापती असलेले प्रा. डॉ. रामवचन राय यांचे नाव सभापतीपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

बिहारमध्ये भाजप आणि JDU यांच्यातील सत्तासमीकरणाच्या पार्श्वभूमीवर अवधेश नारायण सिंह यांच्या राजीनाम्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

३३ वर्षांपासून विधान परिषदेचे सदस्य

राजीनामापत्रात सिंह यांनी आपण गेल्या ३३ वर्षांपासून विधान परिषदेचे सदस्य असल्याचे नमूद केले. सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही विधान परिषदेचे सदस्य म्हणून आपली सक्रिय भूमिका कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक जीवनातील जनसेवा आणि सामाजिक उपक्रमही पुढे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभापती म्हणून काम करताना सर्व सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

‘पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार’

अवधेश नारायण सिंह यांनी आपण चार वेळा विधान परिषदेचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. आपल्या कार्यकाळात कोणत्याही सदस्याशी मतभेद झाले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

भाजपने आपल्याला मोठी संधी दिली असून भविष्यात पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारून पार पाडणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. यापूर्वी त्यांनी भाजपचे कोषाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

दरम्यान, रामवचन राय यांची सभापतीपदी निवड झाल्यास आपल्याला आनंद होईल, असेही अवधेश नारायण सिंह यांनी सांगितले.

Leave a Comment