अहिल्यानगर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल १७० अर्जांची विक्री झाली. त्यामुळे पहिल्या दिवशी ३६१ असलेली अर्ज विक्रीची संख्या दुसऱ्या दिवशी ५३१ वर पोहोचली आहे.
दरम्यान, राहुरी तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपचे आमदार प्राजक्त तनपुरे, महिला राखीव मतदारसंघातून जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा गुंड, तर बिगरशेती मतदारसंघातून धनलक्ष्मी हजारे यांनी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे उमेदवारी अर्ज खरेदीसाठी वाढत असलेली गर्दी पाहता बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांसमोर आव्हान निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी अनेक इच्छुकांनी एकाचवेळी एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज खरेदी केल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी काळात निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.
अर्ज विक्रीची निर्धारित वेळ संपल्यानंतर दुपारी तीन वाजल्यानंतरही काही इच्छुकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज मिळवून देण्याची मागणी केली. जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदांसाठी ही निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज खरेदी व दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. मतदार यादीत नाव असणे ही उमेदवारी अर्ज खरेदीसाठी आवश्यक अट आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तींना या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम टप्पा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी आणि गुरुवारी उमेदवारी अर्ज खरेदी व दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यानंतर शुक्रवार ते रविवार सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी थेट ५ ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत उमेदवारी अर्ज खरेदी आणि दाखल करण्याच्या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
दिग्गजांकडूनही अर्जांची खरेदी
मंगळवारी माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, माजी उपाध्यक्ष रामदास वाघ, संचालक प्रशांत गायकवाड, गीतांजली शेळके, पांडुरंग सोले पाटील, घनश्याम शेलार, तसेच प्रमोद राहणे यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती निवडणूक सूत्रांनी दिली.
याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, पारनेरचे वैभव लंके, विजयलक्ष्मी फाळके यांच्यासह अन्य इच्छुकांनीही अर्ज खरेदी केल्याचे सांगण्यात आले.
दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये राहुरी तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून आमदार प्राजक्त तनपुरे, महिला राखीव मतदारसंघातून जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा गुंड आणि बिगरशेती मतदारसंघातून धनलक्ष्मी हजारे यांचा समावेश आहे.
