‘एमआयडीसीसाठी अमोल खताळ सक्षम’ ; रऊफ शेख यांचा सत्यजित तांबेंना टोला

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) : पदवीधर मतदारसंघाची व्याप्ती पाच जिल्हे आणि ५३ तालुक्यांपर्यंत असल्याने संपूर्ण मतदारसंघातील पदवीधरांच्या प्रश्नांकडे आमदार सत्यजित तांबे यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र, साकूर पठार भागातील प्रस्तावित एमआयडीसीचा विषय आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून शासनदरबारी पुढे जात असताना या विषयाचे श्रेय घेण्यासाठी इतरांनी पुढे येण्याची गरज नाही, असा खणखणीत टोला भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आमदार सत्यजित तांबे यांना लगावला. या वक्तव्यामुळे एमआयडीसीच्या श्रेयावरून साकूर पठार भागातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

आमदार अमोल खताळ पाटील यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान संगमनेर तालुक्यात एमआयडीसी उभारण्याचा संकल्प केला होता. आमदार झाल्यानंतर त्यांनी या विषयाला प्राधान्य देत कौठे मलकापूर येथील प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे रऊफ शेख यांनी सांगितले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने हा विषय शासनदरबारी पुढे नेण्यात येत असल्याचेही शेख यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीचा विषय केवळ राजकीय घोषणा किंवा प्रसिद्धीपुरता मर्यादित नसून, त्यासाठी शासनस्तरावर आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

विधिमंडळाच्या अधिवेशनातही आमदार अमोल खताळ यांनी एमआयडीसीच्या विषयासंदर्भात प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा सुरू ठेवला असल्याचे शेख यांनी सांगितले. कौठे मलकापूर येथील प्रस्तावाबाबत आवश्यक तांत्रिक पूर्तता पूर्ण झाल्यानंतर पुढील शासकीय कार्यवाही अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘एमआयडीसीसाठी खताळ सक्षम’

साकूर पठार भागात एमआयडीसी उभारण्यासाठी आमदार अमोल खताळ सक्षम असल्याचा दावा करताना, या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी इतरांकडून प्रयत्न होऊ नयेत, अशी टीकाही रऊफ शेख यांनी केली.

साकूर पठार भागातील पाणीप्रश्नाचा संदर्भ देत शेख म्हणाले की, काही दिवसांपूर्वी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना पदवीधर आमदारांनी पाण्याची उपलब्धता नसताना एमआयडीसी कशी उभारणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, आता एमआयडीसीच्या श्रेयावरून सुरू असलेल्या चर्चेबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

पठार भागातील पाणीप्रश्न आणि एमआयडीसीचा विषय हे दोन्ही प्रश्न शासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आमदार अमोल खताळ यांचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

‘प्रस्तावाची दिशा बदलण्याचा डाव तर नाही ना?’

कौठे मलकापूर येथील प्रस्ताव शासनदरबारी असताना समाजमाध्यमांवर इतर ठिकाणांची चर्चा सुरू असल्याचा दावा रऊफ शेख यांनी केला. त्यामुळे साकूर पठार भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

“कौठे मलकापूरचा प्रस्ताव शासनाकडे असताना इतर ठिकाणांची चर्चा का केली जात आहे? प्रस्तावित एमआयडीसीची दिशा बदलण्याचा किंवा प्रकल्प दुसरीकडे नेण्याचा डाव तर नाही ना?” असा सवाल शेख यांनी उपस्थित केला.

गेल्या अनेक वर्षांपासून साकूर पठार भागातील पाणीप्रश्न तसेच संगमनेर तालुक्यात एमआयडीसी उभारण्याचा विषय प्रलंबित आहे. या प्रश्नांना अपेक्षित प्राधान्य मिळाले नसल्याचा दावा करताना, आता प्रत्यक्ष प्रस्ताव शासनदरबारी गेल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी धडपड का केली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘श्रेयापेक्षा विकास महत्त्वाचा’

साकूर पठार भागातील नागरिकांना राजकीय श्रेयापेक्षा प्रत्यक्ष विकास अपेक्षित आहे. एमआयडीसी प्रत्यक्षात उभी राहून स्थानिक युवकांना रोजगार मिळणे, शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणे आणि परिसराला औद्योगिक विकासाची दिशा मिळणे हीच प्राथमिक गरज असल्याचे रऊफ शेख यांनी सांगितले.

“एमआयडीसीचे श्रेय कोणाला मिळते, यापेक्षा ती प्रत्यक्षात उभी राहून स्थानिक युवकांना रोजगार मिळणे महत्त्वाचे आहे. साकूर पठार भागाच्या विकासासाठी राजकारण न करता सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे,” असे शेख यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment