संगमनेर (DSNews24/किरण पुरी) : संगमनेर तालुक्यातील साकूर बसस्थानकात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्या गळ्यातील सुमारे ९५ हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी घडली. भरदिवसा बसस्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. संबंधित व्यक्तींची छायाचित्रे साकूर परिसरात लावण्यात आली असून, त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यास तातडीने घारगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे व उपनिरीक्षक प्रवीण महाले यांनी केले आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, चिखलठाण (ता. राहुरी) येथील सोपान पोपट डोलनर हे त्यांची आई तान्हुबाई डोलनर यांना उपचारासाठी साकूर येथे घेऊन आले होते. दुपारी सुमारे १.३० वाजता त्यांनी आईला साकूर बसस्थानकात बसवले आणि स्वतः जवळील सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेले.
सुमारे अर्ध्या तासाने दाढी करून ते पुन्हा बसस्थानकात आले. त्यावेळी तान्हुबाई यांनी तीन अनोळखी व्यक्ती आपल्याजवळ आल्या होत्या, त्यांनी आपल्याला भुरळ पाडून बाजूला नेले आणि त्यांच्या सांगण्यावरून आपण गळ्यातील मणी मंगळसूत्र काढून दिल्याचे मुलाला सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर सोपान डोलनर यांनी साकूर परिसरात संबंधित व्यक्तींचा शोध घेतला. मात्र, त्या आढळून आल्या नाहीत. चोरीस गेलेल्या मंगळसूत्राची अंदाजे किंमत ९५ हजार रुपये असून त्याचे वजन सुमारे दोन तोळे असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनोळखी तीन व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
