मोठी बातमी! जिल्हा बँक निवडणुकीतून राम शिंदेंची माघार; ऐनवेळी मोठी राजकीय घडामोड

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

कर्जत-जामखेडसह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि समर्थकांशी सखोल चर्चा केल्यानंतर राम शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या माघारीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी (दि. ६) अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर बुधवारपासून वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

बिनविरोध न झालेल्या जागांसाठी २ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राम शिंदे यांच्या माघारीनंतर आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुढील राजकीय हालचालींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment