बिग ब्रेकिंग! जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेची एन्ट्री ; संगमनेरमधून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगत असतानाच शिवसेनेनेही निवडणुकीच्या आखाड्यात सक्रिय प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जिल्हा बँकेत आपली ताकद आजमावण्याचा निर्णय घेतला असून, संगमनेर तालुक्यातून तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांकडून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरविल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांसमोर शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने जिल्ह्यातील विविध तालुक्यांत उमेदवार मैदानात उतरविण्याची तयारी केली असून, सहकार क्षेत्रातील प्रस्थापित गटांसमोर राजकीय आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.

संगमनेर तालुक्यात आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेती सहकारी संस्था मतदारसंघातून निमज येथील बादशाह दत्तू गुंजाळ, शेतीपूरक, शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघातून मंगळापूर येथील शंकर मारुती वाळे, तर अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून पंढरीनाथ माधव इल्हे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, कमलाकर कोते, रावसाहेब खेवरे, प्रशांत लोखंडे, विठ्ठल घोरपडे, रमेश काळे, रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, दादाभाऊ गुंजाळ, डॉ. संतोष डांगे, दत्तात्रय दिघे, शशिकांत मतकर यांच्यासह संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेच्या या उमेदवारीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणते गट कोणासोबत राहणार आणि बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांना कितपत यश मिळणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment