बापरे! महाराष्ट्रात पुन्हा उकाड्याचा तडाखा! तापमान ३९° पर्यंत जाणार?

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली असून बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदले जात आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्याच्या उत्तरेकडील भागात कमाल तापमानात आणखी २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्याच्या अंतर्गत भागात ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत उकाडा वाढण्याची शक्यता असून नागरिकांना उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून मोसमी पाऊस माघारी जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकणात मागील तीन ते चार दिवसांपासून उष्ण आणि दमट वातावरणामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली होती. रत्नागिरी येथे ३८ अंश सेल्सिअस, तर मुंबईतील कुलाबा येथे ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मात्र, सोमवारी कोकणातील कमाल तापमानात काहीशी घट होऊन ते ३२ ते ३४ अंशांच्या दरम्यान नोंदले गेले.

मध्य महाराष्ट्रातही उष्णतेचा प्रभाव कायम आहे. जळगाव येथे ३७.५ अंश, तर मालेगाव येथे ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मालेगावचे तापमान सरासरी कमाल तापमानापेक्षा तब्बल ५.९ अंशांनी अधिक होते. सोलापूर येथे ३७.४, परभणी ३५.७ आणि सातारा येथे ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.

हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

एकीकडे राज्यातील काही भागांत उकाडा वाढण्याची शक्यता असताना विदर्भातील काही भागांत ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्याला मंगळवार आणि बुधवारसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मंगळवारी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा संध्याकाळी गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग आणि सातारा घाट विभागातील काही भागांतही मंगळवारी वादळी पावसाची शक्यता असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत कोरडे हवामान राहण्याची शक्यता

मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यात उकाडा कायम आहे. उष्ण व दमट वातावरणामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. मात्र, उत्तर कोकणातील कमाल तापमानात सोमवारी काहीशी घट झाली.

रायगड वगळता उर्वरित उत्तर कोकणात मंगळवारपासून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment