अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी तब्बल ३६९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज, सोमवारी अंतिम मुदत होती. विशेष म्हणजे उमेदवारीसाठी तब्बल ९०३ अर्जांची विक्री झाली होती.
अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि गटांच्या नेत्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूक कार्यालय परिसरात दिवसभर इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
अखेरच्या दिवशी माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डिले, माजी मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे, देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी आमदार भानुदास मुरकुटे व त्यांचे नातू नीरज मुरकुटे, माजी संचालक अमित भांगरे, शिवसेना (शिंदे गट)चे अरुण मुंडे आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रामदास गोल्हार यांच्यासह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
दरम्यान, खासदार निलेश लंके, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने निवडणूक कार्यालय परिसरात दिवसभर राजकीय वातावरण तापले होते. समर्थकांकडून उमेदवारांचे फलक उंचावत घोषणाबाजी करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे काम पाहत असून त्यांना सहाय्यक म्हणून तालुका निबंधक रावसाहेब खेडकर आणि देविदास घोडेचोर काम पाहत आहेत.
महिला मतदारसंघात सर्वाधिक ६३ अर्ज
जिल्हा बँकेच्या विविध मतदारसंघांमध्येही उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. महिला मतदारसंघातून सर्वाधिक ६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून या मतदारसंघातून दोन संचालक निवडून द्यायचे आहेत. विशेष म्हणजे अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पत्नींनीही या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
प्राथमिक सेवा संस्था मतदारसंघात अकोला १९, जामखेड ६, कर्जत १३, कोपरगाव ६, नगर ६, नेवासा ४, पारनेर १०, पाथर्डी ६, राहाता ६, राहुरी ७, संगमनेर ४, शेवगाव ४, श्रीगोंदा १६ आणि श्रीरामपूर ५ अर्ज दाखल झाले आहेत.
याशिवाय शेतीपूरक मतदारसंघातून ३६, बिगरशेती ५४, महिला ६३, अनुसूचित जाती-जमाती २५, ओबीसी ५३ आणि विजाभज-विशेष मागास प्रवर्गातून २६ अर्ज दाखल झाले आहेत.
आता दाखल झालेल्या अर्जांची छाननी आणि त्यानंतरची माघारीची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार असून, माघारीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ३६९ अर्जांपैकी किती उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात राहतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
