महाराष्ट्रातून मॉन्सूनची पुर्णपणे माघार

मुंबई – नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने आज, ८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून पूर्णपणे माघार घेतली आहे. महाराष्ट्रासह गोव्याच्या काही भागांतून तसेच कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतला असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

यंदा १९ सप्टेंबर रोजी उत्तर भारतातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर मॉन्सूनची माघार काहीशी रखडली. ३ ऑक्टोबरपर्यंत देशाच्या जवळपास निम्म्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली होती. आता त्याच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा वेग आला आहे.

आज मॉन्सूनची परतीची सीमा सुपौल, रांची, सुंदरगड, बरगड, बिजापूर, हैदराबाद, बेळगावी आणि पणजी या भागांपर्यंत असल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत पूर्व भारतातील आणखी काही भाग, द्वीपकल्पीय भारताच्या उत्तरेकडील भागासह ईशान्य भारतातील अनेक भागांतून मॉन्सूनच्या माघारीसाठी हवामान अनुकूल राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मॉन्सून माघारी फिरत असतानाच राज्यात उष्णतेचा चटका वाढला आहे. बहुतांश भागांत कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसाच्या सरीही बरसत आहेत.

आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मॉन्सूनच्या माघारीनंतर राज्यातील हवामानात पुढील काही दिवसांत आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment