– १० दिवसांनंतरही ठावठिकाणा नाही; अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा
– कुटुंबीय, नातेवाईक व शिक्षकांकडून विविध ठिकाणी शोध; वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
संगमनेर (DSNews24/किरण पुरी) : तालुक्यातील पठारभागातील सारोळे पठार येथील श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वसतिगृहातून इयत्ता सातवीत शिक्षण घेणारा १२ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निलेश एकनाथ वैजल (वय १२, रा. पोंढ्याचामाळ, पोस्ट भुवन, ता. पेठ, जि. नाशिक) असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. घटना घडून दहा दिवस उलटूनही त्याचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान निलेश बेपत्ता झाला. याप्रकरणी नानासाहेब हरीबा कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश हा सारोळे पठार येथील बाळेश्वर विद्यालयाच्या वसतिगृहात राहून इयत्ता सातवीचे शिक्षण घेत होता. २४ सप्टेंबर रोजी तो शाळेच्या परिसरात असताना बेपत्ता झाल्याचे समोर आले. फिर्यादीत अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून अथवा फूस लावून निलेशला त्याच्या कायदेशीर रखवालीतून, त्याच्या संमतीशिवाय पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, निलेश शाळेच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून चढून उडी मारून बाहेर गेल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे तो नेमक्या कोणत्या परिस्थितीत शाळेच्या आवारातून बाहेर पडला, त्यावेळी त्याच्यासोबत कोण होते, तसेच बाहेर पडल्यानंतर तो कोणत्या दिशेने गेला, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विविध ठिकाणी शोधमोहीम
निलेश बेपत्ता झाल्यापासून त्याचे आई-वडील, नातेवाईक तसेच विद्यालयातील शिक्षकांकडून त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला जात आहे. जुन्नर, संगमनेर, सिन्नर, नाशिक यासह संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अद्याप निलेशचा ठावठिकाणा लागलेला नाही.
घारगाव पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असून, निलेशचा शोध घेण्यासाठी विविध शक्यता तपासल्या जात आहेत. अल्पवयीन विद्यार्थी सलग दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली दखल
दरम्यान, या घटनेबाबत निलेशच्या नातेवाईकांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर मंत्री झिरवाळ यांनी श्री बाळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य उत्तम खांडवी यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्याच्या बेपत्ता होण्याच्या घटनेबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली. मंत्री झिरवाळ यांनी या संदर्भात दूरध्वनीवरून संपर्क साधल्याची माहिती स्वतः प्राचार्य उत्तम खांडवी यांनी DSNews24 शी बोलताना दिली.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे विद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. निलेश शाळेच्या आवारातून नेमका कसा बाहेर पडला? त्यावेळी वसतिगृह व शाळेच्या परिसराची देखरेख कोणाकडे होती? विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
अल्पवयीन विद्यार्थी वसतिगृहातून बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि शाळा व्यवस्थापनाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याकडेही पालकांचे लक्ष लागले आहे.
निलेशचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसल्याने त्याचा शोध लवकरात लवकर लागावा, अशी अपेक्षा कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात या प्रकरणाचे नेमके कारण आणि निलेश बेपत्ता होण्यामागील परिस्थिती स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
