शेतीपूरक मतदारसंघातून त्रिंबक सरोदे यांचा उमेदवारी अर्ज मागे; अनेक मतदारसंघांत उमेदवार रिंगणात
अहिल्यानगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतरही मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली असून, माघारीच्या पहिल्या दोन दिवसांत अवघ्या एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांदरम्यान अनेक मतदारसंघांत उमेदवार अद्याप निवडणूक रिंगणात कायम आहेत.
बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या दोन दिवसांत शेतीपूरक मतदारसंघातून त्रिंबक सरोदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. याशिवाय अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू असताना सुरुवातीच्या दोन दिवसांत केवळ एकच माघार झाल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत कोणते उमेदवार माघार घेतात, याकडे राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. अनेक मतदारसंघांत उमेदवारांची संख्या कायम असल्याने निवडणुकीचे पुढील चित्र माघारीच्या अंतिम टप्प्यात स्पष्ट होणार आहे.
