पुण्यात धर्मादाय वकील संघटनेने जपली सामाजिक बांधीलकी ; राबविला अनोखा उपक्रम

पुणे (DSNews24/किरण पुरी) : धर्मादाय क्षेत्रात कार्यरत असलेल्या वकील, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने पुणे येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (पीटीपीए) अर्थात धर्मादाय वकील संघटनेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, १०० हून अधिक व्यक्तींनी मोफत नेत्र तपासणी करून घेतली.

या शिबिराचे उद्घाटन सहधर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर, धर्मादाय उपायुक्त डॉ. राजेश परदेशी आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुधीर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर अधिकाऱ्यांनी स्वतः नेत्र तपासणी करून घेत शिबिराची सुरुवात केली.

धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, वकील तसेच इतर नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. डोळ्यांची नियमित तपासणी, दृष्टीदोषाचे वेळीच निदान आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे सहभागी व्यक्तींना नेत्र आरोग्याबाबत जागरूक होण्यास मदत झाली.

या प्रसंगी पीटीपीए धर्मादाय वकील संघटनेच्या अध्यक्षा ॲड. अमृता गुरव, सचिव ॲड. रोहिणी पवार, उपाध्यक्ष ॲड. विजयकुमार केळेकर, खजिनदार ॲड. अश्विनी नलावडे, ॲड. दिलीप हांडे, ॲड. राजेश ठाकूर, माजी अध्यक्ष ॲड. शिवराज कदम-जहागीरदार तसेच नेत्रतज्ज्ञ डॉ. सुलभा थोरात यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

डोळ्यांची नियमित तपासणी, दृष्टीदोषाचे वेळीच निदान आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. पीटीपीए धर्मादाय वकील संघटनेतर्फे भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक उपक्रम, कायदेविषयक जनजागृती आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

— ॲड. रोहिणी पवार, सचिव, पीटीपीए धर्मादाय वकील संघटना

Leave a Comment