उमेदवारांची यादी आज दुपारी १२ वाजता जाहीर होणार; अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी तडजोडींकडे लक्ष
अहिल्यानगर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेत सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि उमेदवारांशी चर्चा केली. दरम्यान, उमेदवारांची नावे बुधवारी दुपारी १२ वाजता पालकमंत्री विखे जाहीर करणार असल्याची माहिती सभापती राम शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे कारण पुढे करत राजकीय विरोध बाजूला ठेवून विखे आणि थोरात प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, विरोधी पॅनलच्या तयारीत असलेले राम शिंदे यांनीही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना साथ दिली आहे. खासदार नीलेश लंके यांचीही बैठकीला उपस्थिती होती. त्यामुळे प्रमुख नेत्यांमध्ये सहमती घडवण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या इच्छुकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी तब्बल ३५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतरही २५० हून अधिक उमेदवार निवडणूक प्रक्रियेत असल्याने सर्वांना माघार घेण्यासाठी तयार करणे हे नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे. राजकीय समीकरणे, मतदारसंघनिहाय ताकद आणि इच्छुकांची नाराजी यांचा विचार करून तडजोडीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख यांनी नगरमधील शासकीय विश्रामगृहात मतदारसंघनिहाय आणि तालुकानिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. कोणत्या तालुक्यात तडजोड शक्य आहे, कोण उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे आणि कोणत्या जागांवर एकमत होऊ शकते, याची चाचपणी करण्यात आली.
नेते एकत्र, पण इच्छुकांचे काय?
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली असली, तरी उमेदवारी दाखल केलेल्या इच्छुकांची संमती मिळवणे तितके सोपे नाही. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत या प्रयत्नांना किती यश मिळते, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या एकजुटीपेक्षा इच्छुकांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
