लखनऊ : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत देशाचे नेतृत्व कोणाकडे असेल, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच २०२९ मध्ये चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील भाजपच्या संघटनात्मक बैठकीत त्यांनी हे विधान केल्याने राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. विरोधी पक्षांकडून केंद्रातील सरकार बदलण्याचे दावे केले जात असताना, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही विविध पत्रकार परिषदांमधून मोदी सरकारच्या भवितव्याबाबत भाष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
अमित शाह यांनी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना जमिनीवर उतरून काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. केवळ मोठी पदे मिळवण्याची अपेक्षा न ठेवता संघटना मजबूत करण्यासाठी आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. पक्षातील नाराजी आणि मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा संदेशही त्यांनी दिला.
शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. कार्यकर्त्यांनी याच पद्धतीने मेहनत आणि जिद्दीने काम सुरू ठेवले, तर मोदी चौथ्यांदाही पंतप्रधान होतील. तसेच उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, २०२९ मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, या अमित शाह यांच्या विधानामुळे मोदींनंतर भाजपचे नेतृत्व कोणाकडे जाणार, या चर्चेला सध्या तरी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून स्पष्ट राजकीय संदेश मिळाला आहे. मात्र २०२९ ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरचे नेतृत्व याबाबतचा अंतिम निर्णय मतदारांच्या कौलावर अवलंबून असेल.
