महाराष्ट्रात आठवडाभर पावसाची शक्यता 

मुंबई – बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, पुढील काही तासांत त्याचे तीव्र दाबाच्या क्षेत्रात आणि त्यानंतर चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, कर्नाटक आणि तमिळनाडूसह अनेक भागांत पावसाचा इशारा दिला आहे.

हे हवामान प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकत २ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये २ नोव्हेंबरला अतिमुसळधार, तर ३ नोव्हेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

ओडिशात २ नोव्हेंबरला मुसळधार, तर ३ आणि ४ नोव्हेंबरला काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तेलंगणात २ आणि ३ नोव्हेंबरला पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान, तर तमिळनाडू, पुडुचेरी, केरळमध्ये ३ नोव्हेंबरपर्यंत विविध ठिकाणी पाऊस होऊ शकतो.

महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान काही भागांत पावसाची शक्यता आहे. विदर्भात ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला पाऊस होऊ शकतो. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील काही भागांतही पावसाचा अंदाज आहे.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला –

आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील समुद्रात १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान परिस्थिती खराब राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांनीही विजांच्या कडकडाटात झाडाखाली थांबू नये आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

Leave a Comment