भाजपच्या बड्या मंत्र्याच्या विरोधात वॉरंट जारी, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई – राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे दाखल झालेल्या मानहानी प्रकरणात न्यायालयाने नितेश राणे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने आता मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर दुसरे वॉरंट काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नितेश राणे न्यायालयात हजर राहणार का? या प्रकरणात पुढे काय घडणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंविरोधात वॉरंट

मंत्री नितेश राणे आणि संजय राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून दाखल झालेल्या मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने नितेश राणे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.

हे वॉरंट नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर जारी करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात सातत्याने सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने यापूर्वीही त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले होते. मात्र, या वॉरंटची अंमलबजावणी झाली नसल्याची बाब संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने पुन्हा वॉरंट जारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मे २०२३ मध्ये नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य प्रवेशाबाबत दावा केला होता. संजय राऊत हे येत्या दोन ते तीन आठवड्यांत, म्हणजेच १० जूनपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी राऊत यांच्या पक्षप्रवेशाबाबत काही विधानं केली होती.

या विधानांवरून संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, नितेश राणे यांच्या अनुपस्थितीमुळे आता वॉरंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

यापूर्वीही जारी झाले होते वॉरंट

या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी नितेश राणे यांच्या कणकवलीतील निवासस्थानाच्या पत्त्यावर वॉरंट जारी केले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून कणकवली पोलिसांकडून या वॉरंटची अंमलबजावणी झाली नसल्याचा मुद्दा संजय राऊत यांच्या वकिलांनी उपस्थित केला.

त्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर दुसरे वॉरंट जारी केले आहे. या घडामोडीमुळे नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता न्यायालयाच्या या आदेशानंतर ते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment