नगर जिल्ह्यात जोरदार तर शहरात पावसाच्या सरी बरसल्या. अकोले, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात मोठ्या प्रमाणात घरांचे तसेच पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. सकाळी उन्हाचे चटके लागत होते. अचानक दुपारी बारा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली.
वाऱ्यांचा प्रचंड वेग असल्यामुळे वाहन चालवणं तसंच रस्त्यावर थांबणं सुद्धा कठीण झाल होतं. या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडाल्याने समोरासमोरील दृश्य दिसेनासे झाले होते. वादळी वाऱ्याबरोबर वीजांचाही कडकडाट सुरु होता. परिणामी नगरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता.
पाथर्डी तालुक्यातील बीड हायवेवरील खंरवंडीरोडवरील टोलनाका दुपारी तीन वाजता अचानक आलेल्या चक्रीवादळाने भुईसपाट झाला. यात सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही.
तसेच खरवंडी, कोरडगाव, फुंदेटाकळी, कोळसांगवी परीसरातील अनेक घरांचे पत्रे उडाले असून फळबागांचे नुकसान झाले. तर शेवगाव तालुक्यातील अनेक गावांत वादळ वाऱ्याने धुमाकूळ घातला. पूर्व भागातील, घोटण, आंतरवाली, खानापूर, कऱ्हे टाकळी तसेच शेवगाव, जोहरापूर भागात झाडे उन्मळून पडली.
