Rain Alert : अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांत हवामान खात्याचा मोठा इशारा

Rain Alert  : राज्यात चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अद्यापही मान्सून लांबणीवर आहे. मान्सूनपूर्व पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे देशासह राज्यातील वातावरणात मोठे बदल होत आहेत. कधी उन्हाच्या झळा तर कधी पावसाच्या सरी कोसळत आहेत. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळं या दोन्ही राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका वाढला असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. काल परवा मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर उर्वरीत महाराष्ट्राच्या तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

मात्र आता पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्ये शनिवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, तर काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment