चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले बाळासाहेब थोरात, अजित पवार मुख्यमंत्रीपदाचे…..

पुणे : महाविकास आघाडीतील काही नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील काही भागात पोस्टर्स लागली आहेत. अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांचे समर्थक आपल्या नेत्यांचे बॅनर्स लावून त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करत आहेत.

त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता या भावी मुख्यमंत्रीदावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे किती दावेदार आहेत याची आकडेवारीच बावनकुळे यांनी सांगितली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसमध्ये तर मुख्यमंत्रीपदाचे तीन दावेदार आहेत. काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.

तर राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. ठाकरे गटात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागत आहेत.

एकाच पक्षात तीन तीन मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. असे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे एकूण 10 दावेदार आहेत. 10 मुख्यमंत्र्यांचे हे तीन पक्ष आहेत, अशी खिल्ली चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडवली आहे.

Leave a Comment