संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर ते बिरेवाडी फाटा रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडल्याने रस्त्याची पुन्हा जैसे थीच दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत १ किमी या रस्त्याच्या डागडुजीसाठी गेल्या वर्षी साधारणपणे १४ लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला होता. तसेच रस्त्याचे काम एका ठेकेदाराने यावर्षी जानेवारी महिन्यात चालू केले होते. परंतु आज सहा महिने झाले तरी देखील ठेकेदाराने काम पुर्णच न केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेले काम आजपर्यंत ठेकेदाराने पुर्ण न करता अर्धवट का सोडले? हाच प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत असलेला साकूर ते बिरेवाडी फाटा हा मार्ग दळणवळणच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतू गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून वारंवार मागणी करूनही रस्त्याची जै थीच अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या साईट पट्ट्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने जिल्हा परिषद अंतर्गत १ किमी रस्त्याच्या डागडुजीसाठी साधारणपणे १४ लक्ष रुपये निधी मंजूर झाला. त्यानंतर रस्त्याचे काम देखील जानेवारी महिन्यात सुरू झाले होते. कामाच्या सुरूवातीलाच पैसे वाचविण्यासाठी संबंधित ठेकेदाराने साईट पट्ट्या बुजवण्यासाठी मुरूमाचे जागोजागी ढीग टाकले. मात्र काही ठिकाणी तर मुरूमाऐवजी चक्क मातीनेच साईट पट्ट्या बुजवण्याचा पराक्रम केला होता.
त्यानंतर एका उपोषणाच्या ठिकाणी बिरेवाडी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने माती काढून मुरूम टाका अशी मागणी केली होती. त्यानंतरही ठेकेदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून मलमपट्टी लावण्याचे काम चालू ठेवले. मात्र आज सहा महिने झाले ठेकेदाराने कामच अर्धवट सोडल्याने पुन्हा रस्त्याची जैसे थीच परिस्थिती होणार आहे. तसेच काही ठिकाणी खडीचे ढीग देखील तसेच पडले आहे. तसेच पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने पुन्हा काम लांबणीवर पडणार आहे. परंतु जो आधी खर्च झाला तो सगळा पाण्यात वाहून जाणार आहे. त्यामुळे यास ठेकेदार व प्रशासन जबाबदार राहणार आहे.
तसेच एका उपोषणाच्या ठिकाणी जि. प सा.बा. पंचायत समितीच्या उपविभागाचे उप अभियंता यांनी जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या साकूर ते बिरेवाडी फाटा रस्त्याचे काम १५ एप्रिल २०२३ पर्यंत पुर्ण करू असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु दिलेल्या मुदतीत काम पुर्ण न झाल्याने यास जबाबदार कोण हाच सवाल नागरिक विचारत आहे. तसेच संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
तसेच लवकरच ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काही राजकीय पुढारी, संघटनांनी दिली आहे.
