राज्याचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जळगावमधल्या दिव्यांग शाळेला भेट दिली. यावेळी त्यांचं अनोख्या पद्धतीन औक्षण करण्यात आलं.
उपमुख्यमंत्री फडणवीसांना एका दिव्यांग मुलीनं पायानं टिळा लावला. तसंच पायानं ताट धरत त्यांचं औक्षणही केलं. त्यानंतर फडणवीसांनी शाळेची पाहणी करुन तिथल्या मुलांशी संवादही साधला. या अनुभवाने देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यातही पाणी आलं.
फेसबुकवर त्यांनी पोस्ट करत लिहिले आहे की,’आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच.
कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की “तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.”
ते पाहून मी इतकंच म्हणालो, “ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले – “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!” असं लिहीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
