आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी सुरु आहेत. अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली. यावर आता राज्य निवडणुक आयोगाने राज्यात लवकरच निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्य निवडणुक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृ्ष्णमूर्ती यांच्या नावे एक अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील, असे स्पष्टच झाले आहे.
या अधिसूचनेत म्हटले की, “दि. १ जुलै २०२३ रोजी अस्तित्त्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे.’ असं या अधिसूचनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने नमूद केलं आहे.
तर, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या काही प्रकरणांमुळे निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नसल्याचं सांगितलं जात आहे. या याचिकांच्या सुनावणीनुसार तारखा जाहीर केल्या जातील. असं समजते आहे.
