पावसाळा सुरु झाल्यानंतर काही ठराविक ठिकाणांना भेट देण्याची जणू परंपराच आहे. अशाच काही ठिकाणांमध्ये अनेकांच्याच पसंतीची जागा म्हणजे माळशेज घाट.
मुंबईपासून जवळ आणि नगर कल्याण महामार्गावर येणाऱ्या या माळशेज घाटाची वाट, खोल दरी, त्यातच अडकलेले ढग आणि घाटमाध्यावरून कोसळणारे धबधबे असं एकंदर चित्र इथं दरवर्षी पाहायला मिळतं.
जे पाहण्यासाठी इथं येणाऱ्या पर्यटकांचा आकडाही मोठा. पण, यंदाच्या वर्षी मात्र हे चित्र काही अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
एरव्ही घाटवाटेत येणाऱ्या लहानमोठ्या धबधब्यांपाशी थांबून त्यात भिजण्याचा आणि वाटेतच आलेल्या मुसळधार पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इथं हजेरी लावतात. यंदा मात्र हा आकडा मोठ्या फरकानं कमी झाला आहे. माळशेज परिसरात दरडींचा धोका पाहता इथं पर्यटकांना धबधब्यांच्या परिसरात थांबण्याची आणि गर्दी करण्याची परवानही नाही.
घाट परिसरात कलम 144 सुद्धा लागू करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत पाच जणांपेक्षा अधिक व्यक्ती इथं एकत्र येऊ शकत नाहीत.
परिणामी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले हे आदेश पाहता आता पर्यटकही कोणताही धोका पत्करताना दिसत नाहीयेत. ज्यामुळं पावसानं चांगलाच जोर धरलेला असताना कधीकाळी पर्यटकांनी फुलणाऱ्या माळशेजमध्ये आता शुकशुकाट जाणवत आहे.
