पुणे – नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात

पुणे – नाशिक महामार्गावरून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर तीन मालवाहू वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडलीय.

पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगर लगतच्या चांडोली टोल नाक्याजवळ बंद पडलेल्या कंटेनरला दोन आयशर टेम्पो धडकून भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडलीय

दुध वाहतूक करणारे दोन्ही आयशर टेम्पो एकाच गावातील म्हणजेच चांडोली येथील आहेत. पुण्याच्या बाजूने हे दोन्ही टेम्पो राजगुरूनगर बाजूकडे येत होते. टोल नाक्याजवळ रस्त्यात बंद पडलेल्या कंटेनर वर पहिला टेम्पो धडकला. मागून येणारा त्यावर आदळला.

अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात इतका भीषण होता की चालकाला खेचून बाहेर काढावं लागलय. अपघातात चालक ओंकार सावंत आणि गणेश दांगट गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रस्त्यात अपघात होऊन जागेवरच वाहने अडकून पडली. त्यामुळे भल्या सकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टोल नाका ते शिरोली परीसरात एक बाजूने वाहतूककोंडी झाली होती. प्रवासी, वाहनचालकांना जवळपास दोन तास जागेवरच वाहने उभी करावी लागली. वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाहने रस्त्यातून बाजूला केली.

Leave a Comment