अहमदनगर (DSNews24/सुनिल नजन) भारत राष्ट्र समिती हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेच्या (४८) आणि विधानसभेच्या (२८८) जागा लढविणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीत नव्याने नेमनुक झालेले राज्य कार्यकारीणीचे सदस्य भानुदास मुरकुटे यांनी दिली. ते अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे झालेल्या बी. आर. एस. पक्षाच्या जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
त्यांच्या समवेत दुसरे राज्य कार्यकारिणी सदस्य घनश्याम अण्णा शेलार हेही आवर्जून उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा मतदारसंघातून घनश्याम शेलार आणि उत्तरेतून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भानुदास मुरकुटे यांची राज्य कार्यकारिणी वर सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.
श्रीरामपूर येथे झालेल्या मेळाव्यात अनेक नवीन चेहऱ्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षात गढूळ झालेल्या पक्षिय राजकारणात बी.आर.एस. पक्षाला सुगीचे दिवस आले असुन इतर पक्षातील अनेक जण बी.आर.एस. पक्षप्रवेशासाठी सारखे धडपड करीत आहेत.
काही जण थेट तेलंगाणाला जाउन पक्षा अध्यक्ष आणि तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या पायावर लोटांगण घालीत पक्षप्रवेशासाठी विनवणी करीत आहेत. आगामी निवडणूकीत प्रस्थापित पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची सुतराम शक्यता नसलेले ईतर पक्षातील आजी माजी आमदार,खासदार यांचा या मध्ये समावेश आहे.
या मेळाव्या प्रसंगी भारत राष्ट्र समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य माणिकराव कदम, गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, नाशिक विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव, कदिर मौलाना, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे मुख्य समन्वयक संदिपजी राजळे, शेवगाव तालुक्याचे युवा नेते पप्पू केदार, नेवाशाचे तालुका समन्वयक ओंकार बडाख, यांच्या सह जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते उपस्थित होते.
