बिरेवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र पडलेय आजारी ; ग्रामपंचायतीकडून इलाज होईना

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी गावातील जलशुद्धीकरण केंद्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे बंद अवस्थेत पडले आहे. जलशुद्धीकरण असूनही शुद्ध पाणी प्यायला मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला नेमका असा कोणता आजार झालाय म्हणून ग्रामपंचायतीकडून इलाजच होताना दिसत नाहीय. तसेच काही महिन्यांपासून बंद पडलेले जलशुद्धीकरण ग्रामपंचायत प्रशासन कधी चालू करणार हाच सवाल ग्रामस्थ विचारत आहे.

अधिक माहिती अशी आहे की, बिरेवाडी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणी मिळावे म्हणून काही महिन्यांपूर्वी गावातील साकूर – बिरेवाडी रोडलगत लाखो रुपये खर्च करून पत्र्याच्या रुममध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. तसेच ग्रामस्थांना शुद्ध पाणी नेण्यासाठी बाहेरील बाजूने कॉईन बॉक्स व नळाची देखील सुविधा करण्यात आली होती. थोडे दिवस जलशुद्धीकरण सुरळीतपणेही चालले.

परंतु त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र काही दिवसातच बंद पडले. देखभालीची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने ग्रामस्थांना इतर ठिकाणाहून शुद्ध पाणी आणावे लागत आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता नेमका जलशुद्धीकरणाला झालेला आजारच समजून आला नाही.

शुद्ध पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांना नळ पाणीपुरवठा योजनेचेच पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण असूनही काही उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने जलशुद्धीकरण केंद्र चालू करावे अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Comment