टेम्पोला दुचाकी आडवी लावून युवकाला मारहाण करीत त्याच्याकडील 30 हजार रूपयाची रोख रक्कम लुटून नेली आहे. शुक्रवारी (दि. 4) रात्री एक वाजता टिळक रस्त्यावरील राज पॅलेस जवळ, पटेल मंगल कार्यालयासमोर ही घटना घडली.
याप्रकरणी स्वप्निल रावसाहेब गंगावणे (वय 18 रा. कवडाणे, ता. कर्जत) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून संशयित ऋषी रासकर (रा. सारसनगर) व एक अनोळखी यांच्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगावणे यांनी टेम्पोत लाकडे भरून ते दोन साथीदारांना घेवून टिळक रस्त्यावरील वखारीत खाली करण्यासाठी आले होते.
त्यांचा टेम्पो रात्री एक वाजता टिळक रस्त्यावरील राज पॅलेस जवळ पटेल मंगलकार्यालयासमोर आला असता दोघांनी दुचाकी आडवी लावली. ते दोघे गंगावणे यांच्याजवळ आले व ‘तुझ्याजवळ जेवढे पैसे असतील तेवढे सर्व इकडे दे’, असे म्हणून गंगावणे यांना मारहाण केली.
त्यांच्या पाकिटातील 30 हजार रूपयाची रोख रक्कम काढून घेतली. टेम्पोच्या दरवाजावर दगड मारून नुकसान केले. दरम्यान, घटनास्थळी सोमनाथ रतन चव्हाण (वय 32) व मयुर चंद्रकांत ढाणके (वय 24, दोघे रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता) हे आले.
त्यांनी सांगितले की, लुटमार करणार्यांपैकी एक ऋषी रासकर व एक अनोळखी असून त्यांनी आमची दुचाकी नंदनवन हॉटेलजवळून बळजबरीने चोरून आणली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
