पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील म्हाळुंगे तर्फे आंबेगाव येथील रामचंद्र गणपत मसळे यांच्या घरात एक मोठी घटना घडली. याठिकाणी बिबट्याने रात्रीच्या दरम्यान घरात प्रवेश करून टीव्हीच्या टेबलखाली ठाण मांडल्याने घरातील सर्वांचीच धांदल उडाली.
नंतर प्रसंगावधान राखून घरातील महिलांनी सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले. वन विभागला माहिती मिळताच रेस्क्यू टीमने बिबट्याला ताब्यात घेतले आणि माणिकडोह येथील निवारा केंद्रात दाखल केले. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.
दरम्यान, बिबट्या कोणाला काही कळायच्या आत टीव्हीच्या टेबलाखाली लपून बसला. घरात सर्व जण झोपले होते. रात्रभर बिबट्याही तेथेच होता. सकाळी दूध काढण्यासाठी घरातील माणसे उठल्यावर त्यांना टीव्हीच्या खाली बिबट्याचे शेपूट दिसले.
सुरुवातीला त्यांना साप असल्याचा भास झाला. यामुळे त्यांनी काठीने शेपटी हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर बिबट्या दिसताच सर्वांची पळापळ झाली. यावेळी घरात रामचंद्र मसळे यांची पत्नी सुगंधा, आई जिजाबाई यांनी प्रसंगावधान दाखवून घराबाहेर धाव घेतली.
या घटनेची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली. वन विभागाने त्याला पकडण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेऊन बेशुद्ध केले. यानंतर पाच ते सहा वर्षे वयाचा पूर्ण वाढ झालेला बिबट्या ताब्यात घेण्यात आला.
दरम्यान, बिबट्या घरात अडचणीच्या जागेत जाऊन बसला होता. तो पावसात भिजल्याने व त्याला काही ठिकाणी जखमी झाल्याने तो आजारी होता; तसेच घाबरल्यामुळे तो लवकर घरातून बाहेर निघत नव्हता.
