पाकिस्तानमधून एक मोठी घडामोड समोर येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानची संसद बरखास्त झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पाकची संसद बरखास्त केली आहे…
संसदेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्यात आली आहे. संसदेच्या पाच वर्षांचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी संपणार होता. त्यानंतर, सार्वत्रिक निवडणुका पाकिस्तानात घेण्यात येणार होत्या.
परंतु, कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच संसद बरखास्त करण्यात आल्याने निवडणुका होईपर्यंत देशावर नियंत्रण ठेवण्याकरता काळजीवाहू प्रशासनाची निवड केली जाणार आहे. तसंच, येत्या ९० दिवसांत निवडणुका घेता याव्यात याकरता संसदेत विरोधी पक्षनेताही निवडला जाणार आहे.
राष्ट्रपतींकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कलम ५८(१) अंतर्गत नॅशनल असेंब्ली विसर्जित केली आहे. या मंजुरीनंतर, केंद्रीय मंत्रिमंडळ देखील विसर्जित झाली.
विरोधी पक्षनेत्याशी चर्चा करून काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे. दरम्यान, नव्या जनगणनेच्या आधारे शेकडो मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आल्याने पाकिस्तानात मतदान प्रक्रियेला विलंब होऊ शकतो.
