नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे घ्यावा. हा पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. देशात भाजप विरोधी जनमत निर्माण झाले आहे. राहुल गांधीच देशाचे सक्षमपणे नेतृत्व करू शकतात अशी जनभावना तयार झाली आहे. भाजपला विकास करता आलेला नाही. महागाई, बेरोजगारी, सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे.
दक्षिणची जागा काँग्रेस जिंकेल असे म्हणत माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरातांना उमेदवार करण्याची एकमुखी मागणी नगर शहरासह दक्षिणेतील सर्वच तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी निरीक्षक माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरेंकडे केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना मी कोअर कमिटी समोर मांडणार असल्याचे यावेळी हांडोरे म्हणाले.
दक्षिणेची आढावा बैठक नगर शहरात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. हंडोरे झाले की, दक्षिणेची जागा काँग्रेसने लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. राज्याचे नेते आणि माझे सहकारी बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून ही जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी आम्ही टोकाचा आग्रह धरू. त्यासाठी मित्र पक्षांशी ही आम्ही चर्चा करू. त्यांना समजावून सांगू.
आ. लहू कानडे म्हणाले, ही काँग्रेसची सुवर्णभूमी आहे. ज्यांना काँग्रेसने भरभरून दिले त्यांनीच ताटात छेद केला. जिल्ह्यातील काँग्रेस थोरातांनी सांभाळली अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना आधार दिला. जिल्ह्यातील दोन्ही जागा पक्षाने लढवाव्यात.
गणेश कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी चमत्कार घडवून दाखवला. विखे पिता-पुत्रांच्या दहशतीचे झाकण त्यांनी उडविले.
काँग्रेसने दक्षिणेकडे लोकसभेची जागा घेऊन श्रेष्ठींनी थोरातांना उमेदवार दिल्यास शहरातील आमदारांच्या दहशतीसह विखेंचे ही प्रशासनाच्या दुरुपयोगाच्या माध्यमातून असणारे दक्षिणेतील दहशतीचे झाकण मतदारांच्या मदतीने काँग्रेस कार्यकर्ते कायमचे उडवतील असा हल्लाबोल शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी मंत्री ना.राधाकृष्ण विखे, खा.सुजय विखे यांच्यावर केला.
