अजित पवार गट हा राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्तेत जाऊन बसला आहे. परंतु शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री पद दिलं जाईल,अशी अट भाजपनं ठेवल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते टीव्ही 9 या वृत्तवाहिनिशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शरद पवार आणि अजित पवार भेटीनं संभ्रम निर्माण झालेला नाही. शेवटी ते काका- पुतण्यात आहेत. या भेटीत कोणाची तरी गरज आहे. जो भेटायला जातो त्याचीच गरज असते.
कारण, भाजपने अजित पवार यांच्यासमोर एक अट ठेवलेली दिसतेय. शरद पवार भाजपसोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री पद देऊ अन्यथा मुख्यमंत्री पदाची नुसती स्वप्नच बघा, असं कदाचित सांगितलं असावं, म्हणून अजित पवार शरद पवारांना भेटत असतील, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या या दाव्याची सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.
