इंडिया टुडे सी व्होटरचा लोकसभा निवडणुकीचा सर्व्हे जाहीर झाला आहे. या सर्व्हेनुसार आता निवडणुका झाल्यास देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचंच सरकार येणार आहे.
पण इंडिया आघाडीही मोठी झेप घेताना दिसणार आहे. त्यामुळे पुढील लोकसभेत विरोधकांची संख्याही मोठी असणार असल्याने मोदींसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. तर, सर्व्हेनुसार महाराष्ट्रता महाविकास आघाडीच सरस ठरणार असून महायुतीला चांगली कामगिरी करता येणार नसल्याचं दिसून येत आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा फटका बसणार असल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या सर्व्हेनुसार निकाल आले तर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंडिया टुडे सी व्होटरने हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार आज जर देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यास एनडीएला 306 जागा मिळणार आहेत. तर इंडिया आघाडीला 193 जागा मिळणार आहेत. इतरांना 44 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पक्षनिहाय पाहता भाजप हाच देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येणार आहे. भाजपला 287 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळीही काँग्रेसला 100 चा आकडा पार करता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसला अवघ्या 74 जागा मिळणार आहेत. तर इतरांना 182 जागा मिळताना दिसत आहेत.
