राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार गणेशोत्सवापूर्वी पार पडण्याची शक्यता वर्तविली जात असून त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू होताच शिंदे गटात आनंदाची लाट पसरल्याचे बोलले जात आहे…
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भाजप हा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असल्याने या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या वाट्याला सर्वाधिक ७ जागा दिल्या जाणार आहे.
तर उर्वरित मंत्रिपदावर शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता असून एकूण १४ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समजते आहे. तसेच यावर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबईतील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत अधिक स्पर्धा आहे. यात आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे यांचा समावेश आहे.
तसेच यामध्ये आमदार भरत गोगावलेंनी फक्त मंत्रिपदच नाही तर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचा दावा केला आहे. याशिवाय अपक्ष आमदार बच्चू कडू हे देखील मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे या विस्तारात शिंदे-फडणवीस-पावर सरकार कुणाकुणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
