‘त्या’ कार्यकर्त्याला मारहाण का? बाळासाहेब थोरातांचा सवाल..

भंडारा जर पवित्र आहे, त्यातून आशिर्वादच मिळत असतील तर धनगर आरक्षणासाठी तो उधळणार्‍या कार्यकर्त्यांना मारहाण का? असा सवाल करत, आरक्षणासंदर्भात दिले गेलेले आश्वासन पाळले न गेल्याने धनगर समाजात सरकार विरोधात राग आहे.

तसेच मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आणि मराठा समाजात संवाद आवश्यक असून मुख्यमंत्री यांनी राजस्थानऐवजी तिकडे (जालन्याला) जाणे गरजेचे होते. आरक्षणाच्या मुद्यावर सरकार विरोधात मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

नगरमध्ये जनसंवाद यात्रेच्यानिमित्ताने आयोजित फेरीत आ. थोरात बोलत होते. आ. थोरात म्हणाले, सरकार आणि जनतेत संवाद महत्त्वाचा आहे. लोकांना चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले पाहिजे. खोटी आश्वासने द्यायला नकोत.

आज धनगर समाजात सरकारबद्दल राग आहे. 2014 साली झालेल्या निवडणुकीत पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, तसे झाले नाही. यामुळे फसवले गेल्याची भावना समाजात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर महसूल मंत्री यांच्यावर भंडारा उधळण्यात आला.

मंत्री महोदय भंडार्‍याला पवित्र मानत असतील, त्याला आर्शिवाद म्हणत असतील तर तो उधळणार्‍या कार्यकर्त्यांना मारहाण का?, मारहाण होत असतांना मंत्री शांत का होते, असा सवाल आ. थोरात यांनी केला. तसेच सरकार आणि समाजात संवाद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment