तर अजित पवार किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांची होऊ शकते मुख्यमंत्रीपदावर नियुक्ती….. 

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याला वेग दिला आहे. या कारवाईत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यास त्यांच्या जागी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील व नितीन गडकरी यांची नियुक्ती करण्याच्या मुद्यावर भाजपमध्ये मोठा खल सुरू असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यात विलंब केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाने त्यांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे.

पक्षांतर्गत बंदी कायदा व संविधानातील 10 व्या परिशिष्टानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे 16 आमदार अपात्र ठरल्यास शिंदे – फडणवीस सरकारला मोठा धक्का बसू शकतो. असे झाले तर राज्यात अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी भाजपच्या गोटात यासंबंधीची रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

कोण-कोण CM पदाच्या शर्यतीत?

सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेंवर अपात्रतेची कारवाई झाली तर भाजप विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करेल. एवढेच नाही तर भाजपमध्ये या पदासाठी देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर यासंबंधीचे पत्ते उघड केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment