अहमदनगर : सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू

राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील बेलकरवाडीतील तसेच हिमाचल प्रदेश येथे भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर कार्यरत असलेले सुट्टीवर आलेले जवान ज्ञानेश्वर बाबासाहेब ढवळे (वय 24) यांचा सोमवार दि.25 सप्टेंबर रोजी पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे काल दुपारी 4 वाजता घडली.

30 ऑगस्ट रोजी सुट्टीवर आलेले ज्ञानेश्वर ढवळे आपल्या मित्रांबरोबर उत्सुकतेने पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे व दम लागल्यामुळे पाण्यात बुडाले.

सोबत असलेल्या मित्रपरिवाराने त्यांना वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र, ज्ञानेश्वरला त्या तळ्यातील पाण्याने आपल्या कवेत घेतले. त्यानंतर स्थानिक तरूणांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढून उपचारासाठी राहुरी येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले.

परंतू तेथील वैद्यकिय आधिकार्‍यांनी ज्ञानेश्वर यांना उपचारादरम्यान मयत घोषित केले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment