अविस्मरणीय निरोप समारंभ ; गुरुजींना निरोप देताना ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू..

नेवासा : जगातले सर्वात कठीण काम म्हणजे आपल्यांचा निरोप देणे – घेणे. एका टप्याचा शेवट अन् निरोपारंभ. ज्याचा इथच झाला होता प्रारंभ. मनी वसलेली व्यक्ती विसरणे मना आहे. इथं प्रत्येकजण चार दिसाचा पाहुणा आहे. निरोप समारंभ कोणाचाही असो, आठवणीचा खेळ रंगत, गाठ नात्याची असो वा दोराची सुटण्यास वेळ लागणारच. मंगळवार दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी जि.प.प्रा.शा. रामडोह शाळेचे प्रांगण भावविभोर झाले होते. त्याचे कारणही तसेच होते

मुलांसहीत ग्रामस्थांनाही प्रेममयी वागणारे, विद्यार्थ्यांसमवेत रममाण होत शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्य शिक्षण व कृतीतून आपला वेगळाच ठसा उमटविणाऱ्या, प्रचंड मेहनतीसोबतच आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी परीपूर्ण बनवण्यासाठी सर्वस्व ओतून सतत कार्यमग्न असणारे. कुठलंही काम असूद्या. सदैव सैनिका पुढेच जायचे या न्यायाने सोपवलेली जबाबदारी लिलया पेलणारे , अध्यापनातून सतत कार्यमग्न असणाऱ्या , रामडोह शाळेच्या यशात शिरपेच रोवणाऱ्या ‘सुदाम ठाणगे’ सरांची गतवर्षी बदली झाली.

मात्र तब्बल ४ महिन्यांपासून येनकेन प्रकारे लांबत गेलेल्या सन्मान सोहळ्याला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त होऊन सुदाम ठाणगे सरांना निरोपण्यात आले. शाळेच्या वतीने सुदाम ठाणगे सरांना अविस्मणीय भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तर उपस्थित पालक, विद्यार्थ्यांनीही भेटवस्तू देऊन सन्मानित केले. कार्य आपुले असे महान,वर्णु किती महिमा छान, स्वीकारावा सत्कार घेवूनी सन्मान. पुष्पगुच्छ हाती घेवुनी प्रांगणी , हा गोतावळा बघा निरोपास तो जमला. अशा विविध प्रत्यक्ष अनुभवमयी आठवणींच्या शब्दकोंदणमयी गुंफणात वर्णन करुन निरोप देण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थी , ग्रामस्थ व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. लाडके शिक्षक त्यांना सोडून जातांना विद्यार्थ्यांना आपले अश्रु आवरता आले नाही व ते बघून शिक्षकांचेही डोळे पाणावले होते. सत्काराला उत्तर देतांना सुदाम ठणगे सर यांनी या शाळेने मला खुप सांभाळले, शाळेतील सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी माझी खुप काळजी घेतली. ही बांधिलकी मनात सतत कायम ठेवून सदैव ऋणात व सहवासात राहील. ऋणबध्द होतांना त्यांचा कंठ दाटून येत ते भावनाविवश झाले. व निरोपातील आदरातिथ्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.

सुदाम ठाणगे सरांनी देखील शाळेप्रती आपले उत्तरदायित्व निभावत ऋणाईत होतांना शाळेसाठी दहा खुर्च्या प्रत्येक शिक्षकाला भेटवस्तू तर प्रत्येक विद्यार्थ्याला पेन भेट दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामडोह विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य शहाजी गढेकर हे होते तर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे रामडोह गावाचे सरपंच ज्ञानेश्वर बोरुडे , उपसरपंच सुधाकरभाऊ गोरे , रामडोह विविध कार्यकारी सोसयटीचे चेअरमन भारतभाऊ गुंजाळ , मुळा कारखाना संचालक बाळासाहेब गोरे , बापू साहेब गुंजाळ , ग्रामपंचायत रामडोहचे सदस्य नामदेवभाऊ बोरुडे, बाळासाहेब फोलाणे , ज्ञानेश्वर भंडारे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र बोरुडे , उपाध्यक्ष पांडुरंग गुंजाळ , नंदूभाऊ परसैय्या, अशोक बोरुडे, ज्ञानेश्वर तानुडे , भारत परसैय्या ,विलास म्हसरूप , माधुरीताई बोरुडे , शिवकन्या परसैय्या , दिपाली परसैय्या , स्वाती परसैय्या, नीता कट्टे , संगीता गढेकर, कांचन चोरमल यांच्यासह पालक, शिक्षणप्रेमी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

गरमागरम जिलेबी व सांबर भात यांचा आस्वाद घेत गोड आठवणीच्या साठवणीची चव जिभेवर रेंगाळत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खंडागळे , उपाध्यापिका मनिषा पाटोळे , उपाध्यापक दत्तात्रय घुले , उपाध्यापक अशोक लांडगे यांच्यासह विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला . युवा संघर्ष तरुण मंडळा तर्फे श्री. ठाणगे सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला .

Leave a Comment