संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या वर्षी जुलै महिन्यात तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती. तसेच या निवडणुकीत जय बजरंग बली गटाची सत्ता खेचून शेतकरी गट म्हणजेच कॉंग्रेसने ९ पैकी ६ जागांवर बाजी मारत ग्रामपंचायतीवर झेंडा फडकाविला होता. तसेच सरपंच पदाचे आरक्षण महिला असल्याने शेतकरी गटाकडून निलम पांडुरंग ढेंबरे यांची सरपंचपदी व आण्णा भागा कढणे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती.
दरम्यान, शेतकरी विकास गटाच्या (कॉंग्रेस) विचारानूसार सरपंचपदासाठी एक, दीड तसेच अडीच वर्षं असा कालावधी वाटून घेण्यात आला आहे. या ठरलेल्या वाटपानुसार एक वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर निलम ढेंबरे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा ३१ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी राजीनामा पडताळणीसाठी ग्रामपंचायतीकडे पाठविल्यानंतर त्यानुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन २५ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यामध्ये निलम ढेंबरे यांनी राजीनामा दिल्याचे अखेर सिद्ध झाले आहे. यावेळी उपसरपंच आण्णा कढणे, ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांसह अन्य ग्रामपंचायत सदस्य देखील उपस्थित होते.
सरपंचपदाचा राजीनामा सिद्ध झाल्याने सरपंचपदाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे नवीन सरपंचपदाची निवड प्रक्रिया होईपर्यंत सरपंचपदाच्या कार्यभाराची जबाबदारी उपसरपंच अण्णा कढणे यांच्याकडे असणार आहे. तसेच ठरल्याप्रमाणे शेतकरी गटाकडून पुढील दीड वर्षांसाठी सरपंचपदाचे नाव देखील आधीच ठरवले आहे. त्यामुळे यात कुठलीही शंका नाही.
गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत शेतकरी गटाचे निलम पांडुरंग ढेंबरे, आण्णा भागा कढणे, तुळशीराम फकीरा गळंगे, जिजाबाई भाऊसाहेब सागर, पोपट बाळासाहेब नान्नर, शितल दिनकर ढेंबरे असे ६ सदस्य निवडून आले असून विरोधी जय बजरंग बली गटाचे स्वाती नानासाहेब भोसले, शारदा नवनाथ सागर व पंढरीनाथ भाऊ ढेंबरे असे ३ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे शेतकरी गटाने ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावित एकहाती सत्ता काबिज केली आहे. परंतु निलम ढेंबरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने आता विरोधी गटात देखील राजकीय घडामोडींना ऊत आला आहे. त्यामुळे नवीन सरपंचपदाची निवड होईपर्यंत बिरेवाडीत पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
जय बजरंग बली गटाचे ३ सदस्य असून सत्ता काबिज करण्यासाठी आणखी २ सदस्यांची कमतरता आहे. त्यामुळे विरोधी गटाचा सत्ताधारी शेतकरी गटाच्या दोन सदस्यांवर डोळा असणार आहे. दोन सदस्य कोण असणार याची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरपंचपद व सत्ता काबिज करण्यासाठी विरोधी जय बजरंग बली गटाकडून सावध भूमिका घेत अचूक रणनीती आखली जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सत्ताधारी शेतकरी गटात देखील धाकधूक वाढली आहे.
कारण २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राजकीय घडामोडी अशा घडल्या होत्या की बिरेवाडीत चोख पोलीस बंदोबस्तात ऐनवेळी चिठ्ठीवर सरपंचपदाची निवड करण्यात आली होती. त्यामुळे राजकीय घडामोडी कशा घडतील हे देखील सांगता येत नाही. तसेच गेल्या वर्षी देखील निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यापासून ते मतदानाच्या शेवटपर्यंत राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे नवीन सरपंचपदाची निवड होईपर्यंत नेमक्या काय काय गुप्तगू घडामोडी घडणार हे येत्या काळातच समजणार आहे.
