आम्ही पोलिस आहोत, तुमची झडती घ्यायचीय असे म्हणत…. नगरमध्ये घडला भलताच प्रकार 

आम्ही पोलीस आहोत, तुमच्या भूषणनगरमध्ये चोरी झाल्याने आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे, असे म्हणत एका पेन्शनरच्या हातातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी काढून घेत त्यांची फसवणूक केली. रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास केडगाव उपनगरातील झेंडा चौक ते लिंक रस्त्यावरील छत्रपती टॉवर जवळ ही घटना घडली.

राजाराम जानकु रंधवे (वय 69 रा. आयोध्यानगर, केडगाव) असे फसवणूक झालेल्या पेन्शनरचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंधवे हे रेल्वे खात्यातून सेवानिवृत्त झाले असून ते केडगाव उपनगरात राहतात. ते रविवारी सकाळी रस्त्याने घराकडे पायी जात असताना छत्रपती टॉवर जवळ दोन अनोळखी व्यक्ती त्यांना भेटले.

ते रंधवे यांना म्हणाले, आम्ही पोलीस आहोत, तुमच्या येथे भूषणनगरला चोरी झाल्याने आम्हाला झडती घ्यायची सांगितली आहे. त्यामुळे तुमच्या खिशातील सर्व बाहेर काढा. रंधवे यांना वाटले ते पोलीस आहे म्हणून त्यांनी त्यांच्या हातातील अंगठी काढली व रुमालामध्ये ठेवली.

काही वेळात त्या दोघांनी रंधवे यांना भूरळ पाडून अंगठी घेऊन पसार झाले. आपली फसवणूक झाली असल्याचे रंधवे यांच्या लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.

Leave a Comment