मंत्री विखेंची शरद पवारांवर टीका, म्हणाले…..

मुख्‍यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला मिळवून दिलेले आरक्षण आघाडीच्‍याच हलगर्जीपणामुळे गमवावे लागले. राज्‍यात आणि केंद्रात विविध पदांवर काम करण्‍याची संधी मिळूनही महाविकास आघाडीचे नेते म्‍हणवून घेणा-यांनी मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी काही प्रयत्‍न केल्‍याचे कधी दिसून आले नाही.

मराठा समाजाला आरक्षण देण्‍याची महाविकास आघाडीचीच प्रामाणिक इच्‍छा आहे का? असा सवाल महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना उपस्थित केला.

भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष बावनकुळे यांच्‍यावर शरद पवार यांनी केलेल्‍या टिकेचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, आमच्‍या नेत्‍यावर टिका टिपणी करण्‍यापेक्षा मराठा आरक्षणाच्‍या बाबतीत कधीतरी तुम्‍ही भूमिका मांडली पाहीजे.

कारण केवळ वेगवेगळे विषय उपस्थित करून जनतेचे लक्ष विचलित करण्यात माहीर असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्‍यात मुख्‍यमंत्री आणि केंद्रात मंत्री म्‍हणून काम करण्‍याची संधी मिळाली. परंतू या पदांच्‍या माध्‍यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्‍यासाठी कधीही त्यांनी पुढाकार घेतल्‍याचे दिसले नाही.

मिळालेल्‍या पदांच्‍या माध्‍यमातून केंद्रीय नेतृत्‍वावरही कधी दबाव आणला असे पाहायला मिळाले नाही. त्‍यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही तुमची इच्‍छा आहे का हे कधीतरी स्‍पष्‍ट करण्याची वेळ आता आली असल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Leave a Comment