जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला खिंडार पाडण्यात आलं. ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील व युवा सेनेचे जिल्हा समन्वयक विश्वजित पाटील यांच्यासह ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुंबईत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपस्थिती होते.
राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे जळगावमध्ये ठाकरे गटाकडून पक्ष बांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याच्या कारणाने ठाकरे गटात नाराजीचा सूर वाढला.
त्यामुळे सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
