बिरेवाडीत अखंड हरीनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

संगमनेर : साकूर जवळील बिरेवाडी येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज(Sant Tukaram Maharaj) बिजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्याची विविध धार्मिक कार्यक्रमांनी आज उत्साहात सांगता झाली.

ब्रम्हलिन प.पु. माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व मठाधिपती ह.भ.प.दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ५३ वे वर्ष होते. यंदा ३ ते १० मार्च दरम्यान साजऱ्या झालेल्या या सप्ताह काळात दररोज सकाळी काकडा आरती, तुकाराम गाथा पारायण, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन आणि रात्री पंचक्रोशीतील गावांचे भजन असा दिनक्रम होता.

गावातील ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अनेक युवक व युवतीही गाथा पारायण करण्यास बसले होते. तसेच गुरूवारी जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमीत्त सकाळी हरिकिर्तन झाले. सायंकाळी तुकाराम गाथा पारायणाची सांगता करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. या दरम्यान शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्याहून गावात युवकांनी आणलेल्या शिवज्योतीचे उत्साहात स्वागत केले. त्यानंतर टाळ मृदंगांच्या गजरात एकत्रित मिरवणूक काढण्यात आली.

सप्ताहात मठाधिपती ह.भ.प दत्तगिरी महाराज, शिवाजी महाराज दाते, मारूती महाराज अनंत(गुरूजी), दिपक महाराज गुळवे, शांताराम महाराज जोरी, अमोल महाराज गांगुर्डे, उद्धव महाराज कोतवाल, दत्तात्रय महाराज भोर यांची किर्तने झाली. चत्तर महाराज शास्त्री यांच्या काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

गेली सात दिवस बिरेवाडी येथील ग्रामस्थ व सप्ताह कमिटीने सप्ताहाचे सुसज्ज नियोजन केले होते. यासाठी गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सप्ताह काळात साकूरसह परिसरातील हजारो भाविकांनी हजेरी लावत हरिकिर्तन, महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Comment