मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, जरांगे पाटलांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत असून शिर्डीत गेल्या तीन दिवसांपासून सकल मराठासमाजाकडून साखळी उपोषण सुरु आहे.
शिर्डी शहरातून काल मेणबत्ती मोर्चा देखील काढण्यात आला होता. आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा सकल समाजाने शिर्डी बंदची हाक दिली आहे.
दरम्यान, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी साईबाबा संस्थानात साई दर्शन सुरु ठेवण्यात येणार असून साई प्रसादालय देखील सुरु रहाणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज कार्यकर्त्यांच्या आवाहनामुळे जरांगे हे पाणी प्यायले. दरम्यान, शिर्डीत प्रांत कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेले तीन दिवसांपासून सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरु आहे.
त्यातच मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांना पाठींबा दर्शविण्यासाठी उद्या शिर्डी शहर बंदचे आवाहन केले आहे. या बंदमधून साईदर्शन आणि साई प्रसादालय यांना भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वगळले आहे. शिर्डी शहरासह राहाता तालुका बंदचे आवाहन मराठा आंदोलकांनी केले आहे.
राहाता तालुक्यातील 72 गावासह विविध संघटनांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे. शिर्डीतील साई निर्माण करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध म्हणून शैक्षणिक कागदपत्रे आणि EWS यासह विविध कागदपत्रांची होळी करीत घोषणाबाजी केली आहे. तसेच शिर्डीत काल काढण्यात आलेल्या कॅंडल मार्चला राहता तालुक्यासह शिर्डीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
