भीषण अपघात.. भरधाव कार ओढ्यात कोसळून डॉक्टर ठार

पुण्यातील मावळ तालुक्यातिल चांदखेड येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. काम संवपून घरी जाणाऱ्या डॉक्टरवर काळाने घाला घातला आहे. दवाखान्यातील काम संपवून घरी परतत असतांना कार ओढ्यात कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.

डॉ. सत्यजित अर्जुनराव नवाडे (वय ४२) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मावळ तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे डॉ. सत्यजित नवाडे यांचे हॉस्पिटल आहे. रविवारी रात्री त्यांचे काम संपवून ते त्यांच्या कारने घरी येण्यासाठी निघाले होते. दरम्यान, रात्र असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. यामुळे नवाडे वेगाने गाडी चालवत होते.

दरम्यान, ते चांदखेड गावाजवळ आले असता, त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार थेट ओढ्यात जाऊन कोसळली. त्यांच्या गाडीचा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक तातडीने ओढ्याच्या दिशेने धावले. यावेळी त्यांना एक गाडी ओढ्यात पडलेली दिसली. ग्रामस्थांनी तातडीने नवाडे यांना बाहेर काढले.

ही बाब पोलिसांना देखील ग्रामस्थांनी कळवली. दरम्यान शिरगाव पोलिस आणि स्थानिक नागरिक यांनी कार ओड्यातून बाहेर काढली. डॉ. सत्यजित नवाडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment