प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. इंदोरीकर महाराजांना संगमनेर न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय.
इंदोरीकर यांच्याविरोधात PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. इंदोरीकर यांनी अपत्य प्राप्तीबाबत एक वक्तव्य केलं होतं.
तेच वक्तव्य त्यांना भोवलं होतं. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांना जामीन मिळणं कठीण होऊन बसलं होतं. अखेर आज त्यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे इंदोरीकर महाराज सुनावणीच्या एक दिवस आधीच स्वतः कोर्टात हजर राहीले आणि त्यांनी जामीन मिळवला. या प्रकरणावर 24 नोव्हेंबरला सुनावणी होईल, असं जाहीर करण्यात आलं होतं.
त्यानंतर इंदोरीकर महाराजांनी 24 तारखेला इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्याने कोर्टाला विनंती केली होती. त्यांची ही विनंती कोर्टाने मान्य केली.
कोर्टाने इंदोरीकर महाराजांना 20 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला. इंदोरीकर महाराजांचे वकील के. डी. धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली.
