एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र होताना दिसत असून, दुसरीकडे ओबीसींमधून आरक्षण देण्यास मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. यासाठी छगन भुजबळ यांनी अंबड येथे एल्गार सभा घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
याला मनोज जरांगे यांच्याकडून त्याच शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आले असून, आरोप-प्रत्यारोपांची धार आता अधिकच वाढताना पाहायला मिळत आहे. यातच आता भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना, ओबीसींचे आंदोलन, उठाव करण्याची गरज नव्हती, असे म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची जी मागणी आहे त्या मागणीला सरकारची संमती आहे. मात्र, दोन जानेवारीपर्यंत जर सरकारने मुदत घेतली असेल तर जरांगे पाटील यांनीही संयम ठेवायला हवा.
छगन भुजबळ यांनी जो ओबीसींचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती, तर हा उठाव ठीक होता.
पण कुणीतरी आरक्षण मागत आहे म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभे करायचे हे योग्य नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
