भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा उद्धव ठाकरे हे लपून छपून प्रयत्न करत आहेत. युतीसाठी ते भाजपला पायघड्या घालत आहेत, असा गौप्यस्फोट आमदार नीतेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना केला.
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या देशाला २०१४ पासून पनवती लागली आहे, ती येणाऱ्या २०२४ मध्ये संपेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. त्या टीकेला उत्तर देताना आमदार नीतेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या मालकाचे २०१४ आणि २०१९ मध्ये १८ खासदार निवडून आले आहेत. तुमच्या मालकाला सत्ता मिळाली आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाला व पंतप्रधान मोदी यांना नावे ठेवता.
तुमच्या मालकाला जाऊन जरा विचारा, भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा युती करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. युतीसाठी भाजपला पायघड्या घालण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ते तुमचे लोक आणि मालक का करत आहेत, असा सवाल राणे यांनी संजय राऊत यांना केला आहे.
