सत्तेसाठी कोण काय करेल सांगता येत नाही. जळगाव जिल्ह्यातल्या एका चोरट्यानं चक्क घरफोड्या करून सरपंचपदाची निवडणूक लढल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. पाचोरा तालुक्यातल्या बिलवाडी इथल्या प्रवीण पाटीलनं घरफोड्या करून जमवलेल्या पैशातून ग्रामपंचायत निवडणूक लढवली. हे सर्व पैसे त्यानं सरपंचपदाच्या निवडणुकीत उधळल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय.
ग्रामपंचायत निवडणुकीतल्या पराभवानंतरही प्रवीण पाटलाचा रुबाब कायम होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्याबाबत संशय बळावला. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. त्यातून त्याचं बिंग फुटलं. तब्बल 20 घरफोड्या केल्याचं प्रवीण पाटलानं पोलिसांसमोर पोपटासारखं कबूल केलंय.
चोरीच्या ऐवजातून खरेदी केलेली कार आणि बाईक पोलिसांनी जप्त केलीय. धक्कादायक म्हणजे कारनं नातेवाईकांकडे जात प्रवीण पाटील रेकी करायचा आणि मग घरफोडी करायचा. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी केलेली उधळणच प्रवीणला महागात पडली आणि त्याचा पर्दाफाश झाला.
