साकूर – संगमनेर रोडवरील किराणा दुकान चोरट्यांनी फोडले

संगमनेर : तालुक्याच्या साकूर पठारभागातील जांभूळवाडी शिवारात साकूर – संगमनेर रोड लगत असलेले दादाभाऊ विठोबा माने यांचे किराणा जनरल स्टोअर्स दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना वार – रविवार दि. १२ मार्च रोजी मध्यरात्री घडली.

काही दिवसांपूर्वी साकूर येथून चोरट्यांनी राहत्या घरासमोरून बोलेरो गाडी चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात व्यावसायिक, नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक मिळालेली माहिती अशी की, जांभूळवाडी शिवारात साकूर – संगमनेर रोड लगत गेल्या अनेक दिवसांपासून दादाभाऊ विठोबा माने यांचे किरकोळ किराणा मालाचे दुकान आहे. शनिवारी दादाभाऊ माने हे नेहमीप्रमाणे सायंकाळी दूकान बंद करून घरी गेले होते.

रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या दरवाजा उचकटून आत प्रवेश केला व सामनांची उचकापाचक केली. तसेच गल्ल्याचा लॉक तोडून काही रक्कमेसह व दुकानातील साखरेचे तीन कट्टे, शेंगदाणे अंदाजे जवळपास 50 किलो, गोडे तेलाचे दोन डब्बे, तेलाचे बॉक्स, कोल्ड्रिंक्सचे दोन बॉक्स लंपास केले असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील तपास घारगाव पोलिस करत आहेत.

Leave a Comment