श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकरी तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. योगेश शेळके असे मृत तरुणाचे नाव आहे.
योगेश शेळके (35) हे कोथूळ गावात शेती व्यवसाय करत होते. रात्री तीनच्या सुमारास चार अज्ञात व्यक्ती योगेशच्या घरात घुसल्या होत्या. त्यांनी त्याला मारहाम करतच गळा चिरून त्याची हत्या केली. शेतकरी तरुणाचा खून नेमका कोणी केला?
याबाबत अजून स्पष्टोक्ती नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता हत्या करणाऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्यांची ओळख पटली नाही, असे शेजारील रहिवाशांनी सांगितले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
